खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:40 IST2025-07-01T15:39:25+5:302025-07-01T15:40:30+5:30
नवविवाहित वधू ऐश्वर्या हिने तिचा विवाहित बॉयफ्रेंड व्ही तिरुमल रावसोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता.

फोटो - zeenews
इंदूरच्या सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता तिच्यापासून प्रेरणा घेऊन तेलंगणातील एका महिलेने पतीची हत्या केली. नवविवाहित वधू ऐश्वर्या हिने तिचा विवाहित बॉयफ्रेंड व्ही तिरुमल रावसोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता. पती तेजेश्वरची हत्या केल्यानंतर ती अंदमान किंवा लडाखमध्ये तिरुमलसोबत स्थायिक होण्याचा विचार करत होती. मात्र तिला पोलिसांनी पकडलं.
पतीच्या बाईकला लावलं GPS
हत्येपूर्वी ऐश्वर्याने तेजेश्वरच्या बाईकमध्ये जीपीएस बसवलं होतं. तिने प्रथम कॉन्ट्रॅक्ट किलर्सना तिच्या पतीशी मैत्री करण्याचा टास्क दिला. तसेच पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिने १० मोबाईल फोनद्वारे कॉल केले. एसपी श्रीनिवास राव यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी १ चाकू, २ खंजीर, १ जीपीएस डिव्हाइस आणि १० मोबाईल फोन जप्त केले आहेत. खून करण्यासाठी, तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी तेजेश्वरचा मृतदेह नंद्यालमधील पन्यम घाट रोडजवळील कालव्यात फेकून दिला आणि त्याचा मोबाईल फोन कृष्णा नदीत फेकून दिला.
तिरुमल रावसोबत केलं हत्येचं प्लॅनिंग
तिरुमल राव हा कुर्नूलमधील कॅन फिन होम्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आहे. तो लोकांना कर्ज मिळवून देण्यास मदत करायचा. हत्येच्या बदल्यात त्याने परशुरामदू आणि नागेशला पैसे आणि बँकेशी संबंधित काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. नंतर त्याने राजू नावाच्या व्यक्तीलाही त्याच्या प्लॅनिगमध्ये समाविष्ट केलं. त्याने तिन्ही किलर्सना ३.५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. प्लॅनिंगनुसार, तिन्ही किलर्सनी १७ जून २०२५ रोजी तेजेश्वरला आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे नेले, जिथे तो गाडीत बसलेला असताना त्याची हत्या केली.
आईलाही केली अटक
१७ जून २०२५ रोजी तेजेश्वरचा फोन बंद असल्याने त्याच्या भावाने पोलीस तक्रार दाखल केली. तेजेश्वरच्या कुटुंबाला ऐश्वर्याचा संशय आला आणि लग्नाच्या एका आठवड्यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याचं पोलिसांना सांगितलं. ऐश्वर्याच्या सतत कोणाशी तरी फोनवर होणाऱ्या संभाषणांमुळे तेजेश्वर नाराज होता. ती व्यक्ती तिरुमल होती. तपासादरम्यान पोलिसांना ऐश्वर्याच्या तिरुमलासोबतच्या संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा अधिक तपासकेल्यानंतर असं आढळून आलं की ऐश्वर्याची आई सुजाता हिला मुलीच्या दुष्कृत्यांची माहिती होती. तिलाही अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.