संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:06 IST2025-06-24T15:02:36+5:302025-06-24T15:06:57+5:30

हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Telangana hyderabad newly bride ended her after being harassed by her husband for dowry | संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

तेलंगणातील हैदराबाद शहरात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एका नवविवाहितेने गळफास लावून आपले जीवन संपवले. पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवविवाहितेचे नाव पूजिता असून, तिचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. ही घटना हैदराबाद शहरातील कुकटपल्ली हाऊसिंग बोर्ड (KPHB) कॉलनीत घडली. पूजिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूजिताचा पती आणि त्याच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कुकटपल्ली हाऊसिंग बोर्ड (KPHB) कॉलनीमध्ये सोन्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या श्रीनिवासचा विवाह १६ एप्रिल रोजी खम्मम जिल्ह्यातील पूजितासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस श्रीनिवासने पूजिताशी चांगले वर्तन केले. मात्र, त्यानंतर त्याने पूजिताला अतिरिक्त हुंडा आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. तो तिला हुंड्यासाठी छळू लागला.

पतीच्या छळामुळे पूजिता खचली
पतीच्या सततच्या छळामुळे पूजिता पूर्णपणे खचली होती. तिला आयुष्याचा वीट आला होता. पतीचा त्रास वाढल्याने व्यथित झालेल्या पूजिताने रविवारी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत पूजिताने उचललेल्या या टोकाच्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पूजिताच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, पूजिताचा पती श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला मानसिक त्रास दिला. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी लग्नावर ११ लाख रुपये खर्च केले होते आणि हुंडाही दिला होता.

मृत महिलेच्या कुटुंबीयांचे आरोप
लग्नानंतर पूजिताचा पती आणि सासरच्या मंडळींनी १० लाख रुपयांची मागणी करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पूजिताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांनी श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबाला पीक काढल्यानंतर १० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. असे असूनही, त्यांनी पूजिताचा छळ करणे थांबवले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पती श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Telangana hyderabad newly bride ended her after being harassed by her husband for dowry