मुलीच्या प्रेमविवाहाने वडील संतापले; जावयाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करत घर पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:26 IST2025-11-04T14:25:50+5:302025-11-04T14:26:43+5:30
घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू.

मुलीच्या प्रेमविवाहाने वडील संतापले; जावयाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करत घर पेटवले
Hyderabad Crime : आपण स्वतःला 'मॉर्डन' समजतो, पण 'लव्ह मॅरिज'सारख्या गोष्टीला अजूनही भारतीय समाजात पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. मुलांनी प्रेमविवाह केल्यामुळे घरच्यांनी धक्कादायक अथवा क्रुर कृत्य केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील कक्करवाड गावातून समोर आली आहे.
प्रेमविवाहा केल्याने जावयाचे घर पेटवले
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुदीराज कृष्ण आणि मोनिका यांनी अलीकडेच प्रेमविवाह केला होता. मात्र मोनिकाचे कुटुंब, विशेषतः तिचे वडील, या विवाहाला तीव्र विरोध करत होते. या विवाहामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणावाचा शेवट हिंसक स्वरूपात झाला. मोनिकाच्या वडिलांनी कृष्णच्या वडिलांवर हल्ला केला आणि त्यांच्या घराला पेटवून दिले.
घर जळाले, जीवावर बेतला हल्ला
या हल्ल्यानंतर कृष्णच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला कळवले, मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णच्या कुटुंबाने तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीचे पडील फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.
भारतात ‘लव्ह मॅरेज’ला आजही विरोध
2018 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 93 टक्के विवाह ‘अरेंज मॅरेज’ स्वरूपाचे होतात, तर केवळ 3 टक्के लव्ह मॅरेज आणि 2 टक्के ‘लव्ह-कम-अरेंज’ स्वरूपाचे होतात. यावरून स्पष्ट होते की, प्रेमविवाह अजूनही देशातील बहुतेक भागांत सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेलेले नाहीत.