Tehelka rape case: High court rejected Tejpal's plea to postpone trial of victim | तेहलका बलात्कार प्रकरण : पीडितेची उलटतपासणी लांबणीवर टाकण्याची तेजपालची मागणी हायकोर्टाने फेटाळली

तेहलका बलात्कार प्रकरण : पीडितेची उलटतपासणी लांबणीवर टाकण्याची तेजपालची मागणी हायकोर्टाने फेटाळली

ठळक मुद्देम्हापसा सत्र न्यायालयाने पीडीतेच्या उलटतपासणीसाठी येत्या २१, २२ आणि २३ असे तीन दिवस निश्चित केले होते. याचिका निकालात काढताना सुप्रीम कोर्टाने ६ महिन्यांच्या आत ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले.

पणजी - २०१३ साली गाजलेल्या तेहलका बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याने या प्रकरणातील पीडीतेची उलटतपासणी पुढे ढकलण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळून लावली.

तेजपाल याची या संदर्भातील याचिका न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणीस आली. म्हापसा सत्र न्यायालयाने पीडीतेच्या उलटतपासणीसाठी येत्या २१, २२ आणि २३ असे तीन दिवस निश्चित केले होते. तेजपाल यांनी या तारखांना आपले वकील पुढील दोन महिने उपस्थित राहू शकणार नाहीत अशी सबब देत उलटतपासणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलावी यासाठी सत्र न्यायालयाच्या आदेशास हायकोर्टात आव्हान दिले.

या प्रकरणातील ट्रायल सप्टेंबर २0१७ मध्ये सुरु झालेली आहे. परंतु आपल्यावर ठेवलेले आरोप रद्दबातल ठरवावेत या मागणीसाठी तेजपाल याने मध्यंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु त्याची याचिका निकालात काढताना सुप्रीम कोर्टाने ६ महिन्यांच्या आत ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले.

२०१३ मध्ये बांबोळी येथील एका बड्या तारांकित हॉटेलमध्ये तेहलकाच्या इव्हेंटवेळी आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर आहे. त्याच्याविरुध्द भा. दं. वि.च्या कलम ३७६ (बलात्कार), ३४१, ३५४ अ आणि ३५४ ब खाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

Web Title: Tehelka rape case: High court rejected Tejpal's plea to postpone trial of victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.