'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:56 IST2025-09-18T19:52:10+5:302025-09-18T19:56:21+5:30
पश्चिम बंगालमध्ये एका शिक्षकाने सातवीतल्या मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली आहे.

'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड
West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात गेल्या महिन्यात एक विद्यार्थीनी बेपत्ता झाली होती. पोलिसांना दोन दिवसांपूर्वी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. शिकवणीला जाताना विद्यार्थीनी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांना विद्यार्थीनीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोत्यात भरलेला आढळला. या प्रकरणात पोलिसांनी एका शाळेतील शिक्षकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकाने विद्यार्थिनीला लग्नाचे आश्वासन दिल्याचे समोर आलं आहे.
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट शहरात घडलेल्या या भयानक घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारामेसिया गावातील एका १३ वर्षीय आदिवासी मुलीला तिचा माजी शिक्षक मनोज पाल याने जाळ्यात अडकवले. तिच्यावर हल्ला केला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. शिक्षक अल्पवयीन मुलीचा अनेक महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याचे आधीच लग्न झाले होते आणि त्याच्यावर अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप आहे. "तू मोठी झाल्यावर मी तुझ्याशी लग्न करेन. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही," असे पालने मुलीला सांगितले होते.
विद्यार्थिनीच्या वर्गमित्रांनीही शिक्षक शाळेत किंवा शिकवणीला जाताना तिच्या मार्गात वारंवार अडथळा आणायचा असं सांगितले. कुटुंबाने सांगितले की सततच्या छळामुळे त्यांची मुलगी संकटात सापडली होती. २८ ऑगस्ट रोजी जेव्हा मुलगी ट्यूशनसाठी घराबाहेर पडली आणि परत आली नाही तेव्हा प्रकरण आणखी बिकट झाले. तिच्या कुटुंबाने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सुरुवातीला कुटुंबियांना तुमची मुलगी पळून गेली असावी किंवा एखाद्या मुलाला भेटण्यासाठी गेली असावी असं सांगितले. मात्र कुटुंबियांनी संशयित म्हणून शिक्षकाचे नाव सांगितले होते.
१ सप्टेंबर रोजी पोलिसांनी पालला ताब्यात घेतले आणि चौकशी करुन पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर, नवीन पुरावे समोर आल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्याने पोलिसांना मुलीचा मृतदेह जिथे टाकला होता त्या ठिकाणी नेले. पालने मुलीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले होते. तिथे दोन पोत्या सापडल्या ज्यामध्ये अवशेषांचे काही भाग होते. मात्र मृतदेहाचा खालचा अर्धा भाग अद्याप सापडलेला नाही.