स्वारगेट प्रकरणी आरोपीच्या वकिलाचा दावा खोटा?; दत्ता गाडेच्या बँकेत फक्त इतकेच पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:53 IST2025-03-03T12:53:09+5:302025-03-03T12:53:48+5:30
आरोपी आणि पीडिता या दोघांच्या मोबाईलचे २ वर्षाचे सीडीआर डिटेल्स तपासले त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आले नाही.

स्वारगेट प्रकरणी आरोपीच्या वकिलाचा दावा खोटा?; दत्ता गाडेच्या बँकेत फक्त इतकेच पैसे
पुणे - स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलाने कोर्टात भलतेच दावे केले होते. दोघांच्या संमतीनेच शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून वकिलांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले. त्याशिवाय आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशांच्या देवाण घेवाणीतून झाल्याचा दावा केला. परंतु आरोपीच्या मोबाईल आणि बँक खात्याची पडताळणी केल्यास वकिलांचा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात स्वारगेट बस स्थानकातील प्रकार संगनमताने झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे याने काही पैसे दिल्याचेही वकिलांनी सांगितले. पोलीस तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. मग आरोपीकडे अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी आणि पीडिता या दोघांच्या मोबाईलचे २ वर्षाचे सीडीआर डिटेल्स तपासले त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आले नाही.
आरोपी अत्यंत शातीर
स्वारगेट प्रकरणातील आरोपीबाबत अनेक वावड्या उठल्या असून तो समलैंगिक असून त्याद्वारे पैसे मिळवायचा, यापूर्वी आरोपी दत्तात्रय गाडे याने पोलिसांना तो तृतीयपंथी असल्याचं सांगितल्याचीही माहिती समोर आली आहे. आरोपीला बचाव कसा करायचा, याबाबत चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचं पोलिसांनी सांगितले.
दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न?
स्वारगेटच्या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होते. जेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे किटकनाशकाची बाटली सापडली. त्यावर पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला असता, गाडे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता याबाबत आता ठोस सांगणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून गाडेला ताब्यात घेतले तेव्हा गळ्यावर खरचटण्याच्या आणि दोरीने आवळण्याच्या खुणा आढळल्या असं त्यांनी सांगितले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक २ ड्रोन कॅमेरे, श्वान पथकाची मदत घेतली. जवळपास ७१ सीसीटीव्ही, ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपीच्या गावात तळ ठोकून होते.