भोंदू अशोक खरातचे व्यवहार संंशयास्पद; तीन बँक खाती केली सील; मालमत्तांवर टाच येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:56 IST2026-04-11T09:56:14+5:302026-04-11T09:56:38+5:30
ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली

भोंदू अशोक खरातचे व्यवहार संंशयास्पद; तीन बँक खाती केली सील; मालमत्तांवर टाच येणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: भोंदू अशाेक खरातचे तीन तसेच त्याची पत्नी कल्पना खरातचे एक बँक खाते ईडीने सील केले असून, खरातच्या मुलाची बँक खात्याची चौकशी एसआयटी तसेच ईडीने केली आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षांपासूनच्या व्यवहारांची यंत्रणेने पडताळणी केली असून, नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खात्यांवरून खरातच्या खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग झाल्याचे समोर आले आहे. खरातच्या संशयास्पद मालमत्तांवर आता टाच येणार आहे.
एसआयटीने गुरुवारी (दि. ९) मीरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरासह खरातच्या फार्महाउसची कागदपत्र ईडीकडे सोपविली. खरातने दोन बँक खात्यांना पत्नी कल्पनाचे नाव नॉमिनी म्हणून लावले आहे.
ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली
एसआयटीच्या सूत्रांनी खरातच्या अजून एका कारनाम्याची माहिती दिली आहे. खरातकडे जे भक्त येत होते त्यापैकी खरात आपल्यावर अंधविश्वास ठेवणाऱ्या श्रीमंत भक्तांची यादी बनवत असे. त्यांची मानसिकता तयार करून तुमच्याकडे ईडी किंवा आयकर विभागाची धाड पडेल त्यामुळे तुमचे पैसे माझ्याकडे ठेवा किंवा पैसे माझ्यासोबत जमीन खरेदीत गुंतवा, अशी भीती घालून खरात स्वत:चे उखळ पांढरे करत असे.