Suspicious death of owner mansukh hiren of car found outside mukesh Ambani's house | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन (५०) शुक्रवारी मुंब्रा खाडीत मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेगवेगळे आरोप होऊ लागल्याने स्फोटक प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीच्या जवळ २४ फेब्रुवारी रोजी एका स्कॉर्पिओत पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. ती स्कॉर्पिओ मोटार हिरेन यांच्या मालकीची होती. १७ फेब्रुवारी रोजी हिरेन हे आपल्या दुकानातील खरेदीकरिता विक्रोळी येथे गेले असता त्यांच्या मोटारीचे हँडल लॉक झाले. त्यामुळे मोटार विक्रोळी येथे ठेवून ते ठाण्यात आले व त्याच दिवशी मेकॅनिक घेऊन ते विक्रोळीत गेले, तर त्यांना तेथे आपली मोटार जागेवर नसल्याचे आढळले. त्यामुळे विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी वाहन चोरीची तक्रार दाखल केली. २४ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याकरिता त्याच मोटारीचा वापर केला गेला होता. त्यामुळे गेले काही दिवस दहशतवादविरोधी पथक व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी हिरेन यांना चौकशीला बोलावत होते. अलीकडे एक दिवस हिरेन हे असेच चौकशीकरिता गेले व दुसरे दिवशी सकाळी परतले होते. त्यामुळे हिरेन हे पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना ठाऊक होते. स्कॉर्पिओ विक्रोळी येथे बंद पडली. त्या वेळी कार तेथेच सोडून कॅबने क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलेले मनसुख मार्केटमध्ये कोणाला भेटले? याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.


हिरेन हे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता तीन पेट्रोल पंप परिसरातील क्लासिक या आपल्या दुकानात बसले असता त्यांना फोन आला. या वेळी दुकानात त्यांचा थोरला मुलगा मित हजर होता. त्याला हिरेन म्हणाले, कांदिवलीच्या तावडे साहेबांचा फोन होता. त्यांना भेटायला मी जात आहे. दुकानातून निघालेले हिरेन हे डॉ. आंबेडकर रोड येथील विकास पाम येथील आपल्या १४०१ क्रमांकाच्या निवासस्थानी आले व तेथून ८.०० ते ८.१५ वाजता बाहेर पडले. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजले तरी हिरेन घरी न आल्याने व त्यांचा मोबाइल लागत नसल्याने त्यांची पत्नी विमला (४६), पुत्र मित, लय (१६) व वंश (१२) हे काळजीत पडले. त्यामुळे त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठून वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.


मुंब्रा येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता एक मृतदेह तेथील पोलिसांना सापडला. त्या मृतदेहावर   कुठल्याही जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नौपाडा पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी हिरेन कुटुंबाला त्या मृतदेहाची छायाचित्रे दाखवली असता हिरेन  कुटुंबाला धक्का बसला. हिरेन यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा पोलिसांचा दावा त्यांचे कुटुंबीय व मित्र यांना मान्य नाही. आता पोलीस हिरेन यांच्या निवासस्थान व दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळत आहेत. हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज इस्पितळात करण्यात आले.


सचिन वाझे यांची ठाण्यात हजेरी

अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे हे करीत होते. मात्र, अलीकडेच हा तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपविण्यात आला. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याचे कळताच वाझे तेथे हजर झाले. त्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आला.

‘मी घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचलो नव्हतो’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्कॉर्पिओ सापडली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी सचिन वाझे घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला आहे. हा आरोप फेटाळत वाझे म्हणाले की, 'माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा गेल्या होत्या. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक एसीपी, डीसीपी झोन-२ आणि बीडीडीएसचे पथक आधी पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रँचचे युनिट पोहोचले. त्यात मी होतो.


    मुंब्रा खाडीत आढळला मृतदेह
n मनसुख हिरेन गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरातील आपल्या दुकानात असताना त्यांना एक फोन आला. 
n ‘कांदिवलीच्या तावडे साहेबांना भेटायला घोडबंदरला जातोय,’ असे मुलगा मितला (२०) सांगून हिरेन हे दुकानातून बाहेर पडले. 
n शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंब्रा पोलिसांना खाडीत त्यांचा मृतदेह सापडला. 
n हिरेन यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला तेव्हा त्यांच्या तोंडात बरेच रुमाल कोंबल्याचे आढळले.
    
पोहता येणाऱ्याचा 
बुडून मृत्यू कसा?
दररोज पोहायला जाणारे हिरेन यांचा खाडीत बुडून मृत्यू कसा होऊ शकतो? असा संशय त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराने 
व्यक्त केला आहे. 

जे काही सत्य आहे ते समोर येईल. मुंबई पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणा याचा तपास करीत आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या ठाणे पोलिसांकडूनही माहिती घेण्यात येत आहे.
    - परमबीर सिंह, मुंबई पोलीस आयुक्त

Web Title: Suspicious death of owner mansukh hiren of car found outside mukesh Ambani's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.