आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:00 IST2025-11-08T17:59:17+5:302025-11-08T18:00:10+5:30
या घटनेत मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह व सामाजिक दबाव यांचा समावेश असू शकतो का याचा पोलीस शोध घेत आहेत.

आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
गांधीनगर - गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी गांधीनगर येथे ३ पेट्रोल पंपाच्या मालकाचा आणि त्यांच्या २ मुलींचा मृत्यू झाला आहे. नर्मदा कॅनलमधून मालकासह २ मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पेट्रोल पंपाचे मालक एक दिवस आधी २ मुलींचे आधार कार्ड बनवण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर जेव्हा ते घरी परतले नाहीत तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या तिघांचा शोध सुरू झाला. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.
कॅनलमध्ये सापडले ३ मृतदेह
पोलिसांच्या माहितीनुसार, गांधीनगर येथील धीरजभाई रबारी असं मृत व्यक्तीचे नाव आहे. धीरजभाई कथितपणे गुरुवारी सकाळी त्यांच्या २ मुलींना घेऊन घरातून बाहेर पडले होते. मुलींचे आधार कार्ड बनवायचे आहे असं त्यांनी घरच्यांना सांगितले. रात्री उशीरा ते घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंब चिंतेत सापडले. या तिघांचा शोध सुरू झाला. त्यानंतर नर्मदा कॅनलमध्ये ३ मृतदेह सापडले. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
धीरजभाई हे तीन पेट्रोल पंपांचे मालक आहेत, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेत मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह व सामाजिक दबाव यांचा समावेश असू शकतो का याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम अहवाल आणि फोरेंसिक तपास यावरून ही घटना अपघात, आत्महत्या किंवा हत्या यापैकी काय आहे हे कारण स्पष्ट होईल.