तलाठ्याचे संशयास्पद मृत्यू प्रकरण : यवतमाळ येथे दोन ठाणेदारांसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 23:24 IST2021-01-23T22:45:26+5:302021-01-23T23:24:32+5:30
Crime News : दोन वर्षांपूर्वी तलाठ्यांच्या संशयास्पद मृत्य प्रकरणी शनिवारी रात्री येथील अवधूतवाडी पोलोके ठाण्यात चार पोलिसांसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तलाठ्याचे संशयास्पद मृत्यू प्रकरण : यवतमाळ येथे दोन ठाणेदारांसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
यवतमाळ : येथील दांडेकर ले-आऊटमध्ये सासऱ्याच्या घरी एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रथम आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, मृताच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या मुलाचा खून झाल्याची याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत दोन ठाणेदारांसह एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अवधूतवाडीचे विद्यमान ठाणेदार आनंद वागतकर, तत्कालीन ठाणेदार व घांटजीचे विद्यमान ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, पीएसआय ज्ञानेश्वर धावडे यांच्यासह एक जमादार, मृताचे सासू-सासरे, पत्नी आणि साळा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विजय गोविंद गाडवे (रा. गुरुनानकनगर, गोदणी रोड, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. २६ जून २०१८ रोजी त्यांचा सासऱ्याच्या घरी दांडेकर ले-आऊटमध्ये मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळीने त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र, मृताची आई भीमाबाई गाडवे यांनी आपल्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा सासरच्यांनी खून केल्याचा आरोप केला होता. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने हा निर्णय सुनावला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी केली. तपासाअंती आठजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसपींनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी शनिवारी उशिरा रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आठ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.