धक्कादायक! संशयी जावयाकडून सासूची पाईपने मारहाण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 22:59 IST2020-11-28T22:58:39+5:302020-11-28T22:59:25+5:30
Crime News : ही धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास दसरा मैदान रोड स्थित वसंतराव नाईकनगर नं. 2 येथे घडली.

धक्कादायक! संशयी जावयाकडून सासूची पाईपने मारहाण करून हत्या
अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीने दाम्पत्याच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सासूची पाईपने मारहाण करून हत्या केली. ही धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास दसरा मैदान रोड स्थित वसंतराव नाईकनगर नं. 2 येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, कलावती जगन्नाथ मसराम (५६) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी आरोपी जावई अमित किशोर सडमाके (३२, रा. विलायतपुरा, अचलपूर, ह.मु. वसंतराव नाईक नगर नं.२) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
कलावती या वसंतराव नाईकनगर नं. २ येथे गायगोले यांच्याकडे भाड्याने खोली करून राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगी दीपाली आणि जावई अमित सडमाके हेदेखील राहत होते. त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून दोघांचे वारंवार खटके उडत होते. २७ नोव्हेंबर रोजी रात्री अमितचे दीपालीसोबत कडाक्याचे भांडण झाले. कलावती यांनी अमितला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त अमितने कलावती यांनाच मारहाण सुरू केली. प्रकरण टोकाला जात असल्याचे पाहून दीपालीने शेजारी राहणारी मावसबहीण प्रीती महेश तोडासम (३४) यांना घरी बोलावून घेतले. प्रीती पतीसह पोहोचली. त्यांनीही वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अमितने कलावती यांच्या डोक्यावर स्टीलचा पाईप मारला. त्यामुळे त्या गंभीररीत्या जखमी झाल्या.
दीपालीने कलावती यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून आरोपी अमित सडमाकेविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविला. २८ नोव्हेंबर रोजी पहाटेच कलावतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रीती तोडासम यांच्या तक्रारीवरून अमित सडमाकेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला.