तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; काँग्रेस पक्षाचे टी-शर्ट घातल्यामुळे तर्क - वितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 18:50 IST2019-10-17T18:40:31+5:302019-10-17T18:50:25+5:30
भाजपचे पक्ष चिन्ह असलेले टी-शर्ट घालून आत्महत्या केली होती.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; काँग्रेस पक्षाचे टी-शर्ट घातल्यामुळे तर्क - वितर्कांना उधाण
धाड - येथील एका २१ वर्षीय तरुणाने गावालगत असलेल्या एका शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, मृत व्यक्तीने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातल्यामुळे या आत्महत्येबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. सतीश गोविंदा मोरे (२१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांशी या संदर्भात संपर्क साधला असता, मृत युवकाच्या कुटुंबियांना विचारणा केली असता त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सोबतच मृतक सतीष गोविंदा मोरे याच्या अंगात असलेला टी-शर्ट हा जुनाट असून तो ते वापरत होता. धाड गावालगत असलेल्या राजू देशपांडे यांच्या शेतातील गट नं. १४३ मधील झाडास सतिष मोरेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. हा प्रकार १७ ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ हरी गोविंदा मोरे यांनी धाड पोलिसात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश सावळे, पोलिस कॉन्स्टेबल दशरथ शितोळे हे करीत आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसापूर्वीही शेगाव तालुक्यात एका भाजपच्या कार्यकर्त्यानेही भाजपचे पक्ष चिन्ह असलेले टी-शर्ट घालून आत्महत्या केली होती. त्यावेळीही विविध स्वरुपाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मृतकाच्या कुटुंबियांना विचारणा केली असता ते टी शर्ट जूनाट असून तो ते नेहमीच वापरत होता. त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. तपासाअंती नेमकी बाब समोर येईल. - ओमप्रकाश सावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, धाड पोलीस ठाणे