जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 20:29 IST2019-04-27T20:27:58+5:302019-04-27T20:29:34+5:30
कॅन्सरच्या आजाराला कंटाळून केली आत्महत्या

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील ओस्तवाल नगरीमध्ये शुक्रवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. एका सोसायटीचा चेअरमन आणि जेट एअरवेजच्याकर्मचारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव देण्यासाठी चढला होता. सोसायटीच्या लोकांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर घटनास्थळी येऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न न करता अंदाजे 1 तास पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याने इमारतीच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये उडी मारली. सोसायटीच्या लोकांनी नाल्यातून बाहेर काढून अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले असून तुळींज पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. शैलेंद्र कुमार सिंह (५३) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.
ओस्तवाल नगरीमधील साईपुजा सोसायटीत रूम नंबर ई/401 मध्ये शैलेश कुमार सिंह (53) हे आपल्या परिवारासोबत राहत असून ते इमारतीचे चेअरमन होते. मागील तीन महिन्यापासून पोटाच्या कॅन्सरने त्रासलेले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या छतावर गेले आणि उडी मारून जीव देण्याची धमकी देत होते. सोसायटीच्या लोकांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाला फोन करून बोलावले. पण शैलेश यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न न करता पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान एक तास तमाशा बघत राहिले असा रहिवाशांनी आरोप केला आहे. अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास शैलेश यांनी इमारतीच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या नाल्यात उडी मारली.
शैलेश सिंग यांना 3 वर्षांपासून पोटाचा कर्करोग होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिंग यांचा मुलगा सौरभ सिंग (23) हा जेट एअरवेज कंपनीत कामाला होता. उपचाराने बरे वाटत नसल्याने आणि त्यात मुलगाही बेरोजगार झाल्याने सिंग वैफल्यग्रस्त झाले होते. त्यांच्या मुलाची जेट मधील नोकरी गेली असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी दिली आहे.