तडीपार आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंबोली पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:18 IST2018-12-12T17:15:22+5:302018-12-12T17:18:05+5:30
काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तडीपार आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंबोली पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
मुंबई - पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप करत जयसिंग चौहान (वय ४८) या तडीपार आरोपीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौहान याने हा प्रकार करण्यापूर्वी मोबाइलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये तो पोलिसांच्या चौकशीला कंटाळला असून त्याच्याकडून काही वरिष्ठ अधिकारी पैशाची मागणी करत आहेत, दबाव टाकत आहेत. त्यामुळे अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तो आत्महत्या करणार असल्याचे सांगत ती क्लिप सोशल मीडियावर वायरल केली. या व्हिडीओमध्ये त्याने अंबोली पोलीस ठाण्याचे दोन तर डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यावर आरोप केला असून त्याच्या मृत्यूसाठी त्यांनाच जबाबदार धरले जावे अशी विनंती देखील केली आहे. काल अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन कीटकनाशकाच्या बाटलीतील द्रव्य त्याने प्राशन केले. मात्र, तातडीने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चौहानवर तडीपारीची कारवाई आम्ही केली आहे. त्यामुळेच त्याने हा प्रकार केला, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून पोलिसांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या महिन्यात म्हणजे १६ नोव्हेंबरला एका महिला पत्रकाराचा पाठलाग केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी चौहान आणि तासांत पकडून डी. एन. नगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.