अमली पदार्थ विकण्यास जबरदस्ती केल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 16:57 IST2018-08-29T16:57:12+5:302018-08-29T16:57:44+5:30
याप्रकरणी पोलीसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. साईनाथ चलवाडी, मुरगन मिशेल, अनिकेत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून हे तिघेही २० ते २२ वयोगटातील आहेत.

अमली पदार्थ विकण्यास जबरदस्ती केल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या
अंबरनाथ - कॉलेजमध्ये अमली पदार्थ विकण्यासाठी जबरदस्ती केल्याने एका बारावीच्या विद्यार्थ्याने लोकलखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. साईनाथ चलवाडी, मुरगन मिशेल, अनिकेत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून हे तिघेही २० ते २२ वयोगटातील आहेत.
गेल्या शुक्रवारी मोहम्मद झैन या बारावीतील विद्यार्थ्यांने अंबरनाथ जवळील रेल्वे रुळावर लोकलखाली येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी झैनचे वडील झाकीर यांनी कुणीतरी तीनजण झैनला त्रास देत असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानंतर झैनचा चुलत भाऊ ज्याला झैन सर्व गोष्टी सांगायचं त्याने साईनाथ चलवाडी, मुरगन मिशेल, अनिकेत गायकवाड हे झैनला कॉलेजमध्ये अमली पदार्थ विकण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यासाठी ते त्याला त्रासही देत होते असे पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.