गळफास लावून विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:02 IST2020-08-16T21:01:51+5:302020-08-16T21:02:08+5:30
अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या चेतनाला चार बहिणी आहेत. तिचे वडील सुपारीचा व्यवसाय करतात.

गळफास लावून विद्यार्थिनीची आत्महत्या
नागपूर - तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
चेतना रवींद्र चापटे (वय १७) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती गोळीबार चौकाजवळच्या टापरे मोहल्ल्यात राहत होती. अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या चेतनाला चार बहिणी आहेत. तिचे वडील सुपारीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. १५ ऑगस्टला रात्री ८ वाजेपर्यंत ती बहिणीसोबत घरात गप्पाटप्पा करत होती. नंतर बेडरूममध्ये गेली आणि तिने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर घरच्यांनी तिला खाली उतरवून मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून चेतनाला मृत घोषित केले.
माहिती कळाल्यानंतर तहसीलचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चेतनाच्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कारण उजेडात आले नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल थुल यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.