इन्स्टाग्रामवरील वादांचे कधीकधी धक्कादायक परिणाम होतात. हरियाणातील सोनीपत येथूनही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम ग्रुपवर झालेल्या वादानंतर एका विद्यार्थ्याची आई आणि भावासोबत अत्यंत क्रूरपणा करण्यात आला आहे.
सोनीपतमधील सेक्टर-१५ येथील डीएव्ही शाळेसमोर ही घटना घडली. इन्स्टाग्राम ग्रुपवर दोन विद्यार्थ्यांमध्ये कशावरून तरी वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा वाद इतका वाढला की एका बाजूच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरावर हल्ला केला. सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्याला आणि त्याच्या भावाला मारहाण केली, नंतर त्याच्या आईला कारने धडक दिली आणि बोनेटवरून फरफटत नेलं.
गाडीच्या काचा फोडल्या
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झाली नाही, परंतु तिच्या मुलांना दुखापत झाली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचाही फोडल्या. कारचा वेग कमी असल्याने महिलेने त्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला आहे.
इन्स्टाग्राम ग्रुपवर झाला वाद
पीडित महिला आणि तिच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, एका इन्स्टाग्राम ग्रुपवर झालेल्या वादानंतर काही मुलं आली आणि त्यांनी त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला. पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच दुसरीकडे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि व्हिडीओ फुटेजच्या आधारे कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.