डोक्यात घातला दगड , पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:00 IST2022-04-01T22:16:55+5:302022-04-03T22:00:19+5:30
Murder Case : आरोपी जावयाला केली अटक

डोक्यात घातला दगड , पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून
बाभूळगाव (यवतमाळ) : प्रेमविवाह केल्यानंतर पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तिला माझ्यासोबत नांदायला का पाठवत नाही, याचा राग मनात धरुन जावयाने वृद्ध सासऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
विश्राम बिसन वयले (५५) रा. टिटवा ता. चांदूररेल्वे असे मृताचे नाव आहे. वयले यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर (२९) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. राजेश सुरुवातीचे काही दिवस चांगला राहिला, नंतर तो दारूच्या आहारी गेला. पत्नीवर संशय घेवून तिला मारहाण करू लागला. या जाचाला कंटाळून राजेशची पत्नी वडील विश्राम वयले यांच्या घरी रहायला आली. राजेश पत्नीला सोबत चलण्यासाठी तगादा लावत होता. विश्राम वयले यांनी मुलीला पतीकडे जाण्यास परवानगी दिली नाही.
विश्राम वयले हे बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा शिवारातील आशुतोष गुल्हाने यांच्या शेतावर कामाला होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे विश्राम वयले शेतात गेले. ते घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा शंकर शोधण्यासाठी शेतात गेला. तेव्हा विश्राम मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचे दिसत होते. याची तक्रार शंकरने बाभूळगाव पाेलीस ठाण्यात दिली. जावई राजेश शिवणकर यानेच वडिलांचा खून केला असे त्याने तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी ठाणेदार रवींद्र जेधे यांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजेशला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. या ठिकाणी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी आदी करीत आहे.