सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:29 IST2025-07-01T16:28:22+5:302025-07-01T16:29:18+5:30
पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली.

सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर सलग सहा महिने बलात्कार केल्याचा धक्कादायक गुन्हा उघड झाला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली असून, महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीची हृदयद्रावक कहाणी
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, "माझा सावत्र बाप गेल्या सहा महिन्यांपासून माझ्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. मला चाकूचा धाक दाखवून तो वारंवार बलात्कार करत होता. याबद्दल कोणाला काही सांगितले, तर माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी देत होता."
भीतीपोटी मुलगी गप्प राहिली. मात्र, एका आठवड्यापूर्वी तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. सोनोग्राफी तपासणीत ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने आपल्या आईला सावत्र वडिलांच्या या क्रूर कृत्याची संपूर्ण हकीकत सांगितली.
आईची तक्रार आणि पोलिसांची तत्पर कारवाई
पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, "माझ्या पहिल्या पतीचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मी दुसरे लग्न केले. मला या पतीपासून पाच वर्षांची आणखी एक मुलगी आहे." आपल्या मुलीच्या तब्येतीबाबत कळताच, आईने तात्काळ महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे.
भागलपूरचे एसपी सिटी शुभंक मिश्रा यांनी सांगितले की, "या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात येणार आहे." या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.