सावत्र बापाचाच मुलीवर अत्याचार, तक्रारीनंतर आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 14:53 IST2020-10-07T12:33:02+5:302020-10-07T14:53:35+5:30
मुलगी गर्भवती : आरोपीला ठोकल्या बेड्या

सावत्र बापाचाच मुलीवर अत्याचार, तक्रारीनंतर आरोपीला बेड्या
उस्मानाबाद : शहराजवळील राघूचिवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर सलग तीन महिन्यापेक्षा जास्त काळ अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी उस्मानाबाद शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, आरोपीस लागलीच बेड्याही ठोकण्यात आल्या.
उस्मानाबाद शहराजवळील राघूचिवाडी शिवारातील एका शेतात राहणाऱ्या महिलेच्या पतीचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर महिलेने अनिल उत्तम पवार याच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांना दोन अपत्य झाले. मात्र, या लग्नापूर्वी महिलेस मुलगी झालेली होती. सध्या तिचे वय 15 वर्षे आहे. तीन महिन्यांपूर्वी घरात कोणीही नसल्याची संधी साधत अनिल पवार याने आपल्याच सावत्र मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलगी अल्पवयीन असल्याने हा प्रकार तिच्या लक्षात आला नाही. यानंतर आरोपीने तिच्यावर वेळोवेळी संधी साधत अत्याचार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पीडित मुलीने शहर ठाणे गाठून सावत्र पिता अनिल पवार याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. उस्मानाबाद शहर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत एकीकडे गुन्हा दाखल करतानाच आरोपी अनिल पवार यास ताब्यात घेतले. या घटनेत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, अपर अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप मोदे यांच्या सूचनेनुसार आरोपीस उपनिरीक्षक दिनेश जाधव यांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.