Spot on Khaki! Enquiry of Police personnel who beating woman | खाकीला काळिमा! महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी 
खाकीला काळिमा! महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी 

ठळक मुद्देभाईंदर पूर्वेच्या उडड्डाण पुलाजवळील गीता नगरमध्ये गीता सरोवर इमारतीत धीरज शर्मा हे राहतात. सायंकाळी दोघांचा एकमेकांविरोधात अदखपात्र गुन्हा नोंदवत शर्मा यांना सोडून देण्यात आले. 

मीरारोड - दुकानदारासह त्याच्या परिचितांनी केलेल्या मारहाणीची तक्रार देण्यास गेलेल्या महिला व तीच्या पतीसच अर्वाच्च भाषा वापरुन मारहाण केली. तसेच तब्बल ५ तास बसवुन ठेवल्या प्रकरणी नवघर पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी मीरारोडचे उपअधिक्षक यांनी चालवली आहे. दरम्यान महिलेने कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक यांना देखील तक्रार करुन कार्यवाहीची मागणी केली आहे.

भाईंदर पूर्वेच्या उडड्डाण पुलाजवळील गीता नगरमध्ये गीता सरोवर इमारतीत धीरज शर्मा हे राहतात. २० जुलै रोजी इमारतीखाली दुकान असलेला राजु गौड याने अतिक्रमण तसेच अस्वच्छता चालवल्याने शर्मा यांनी त्याला विचारणा केली असता गौड यांच्यासह त्याचा मुलगा आणि तेथील हातगाडीवरील नारळ विक्रेता व अन्य काहींनी शर्मा यांना मारहाण करण्यास सुरवात केली. पत्नी किरण शर्मा यांना या प्रकार रहिवाश्याने कळवल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.किरण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मध्यस्थी करून पतीला मारहाणी पासुन सोडवले. त्यावेळी गौड याने किरण यांना अपशब्द वापरत धमकावले. पती - पत्नी शेजारायांसह दुपारी दिडच्या सुमारास नवघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलीसांनी धीरज शर्मा यांनाच शिवीगाळ व अपशब्द वापरत मारहाण केली. साडे सहा वाजे पर्यंत पोलीस ठाण्यात बसवुन ठेवले. किरण यांना स्वच्छतागृहाचा वापर देखील करु न दिल्याने त्यांचे कपडे खराब झाले. स्थानिक नगरसेविका गीता परदेशी आल्या असता त्यांना सुध्दा उध्दट बोलुन आत टाकू, चॅप्टर केस करु असे दरडावले. सायंकाळी दोघांचा एकमेकांविरोधात अदखपात्र गुन्हा नोंदवत शर्मा यांना सोडून देण्यात आले. 

या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी मीरारोडचे उपअधिक्षक यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराचा निषेध केला. पोलीसांनी कोणाच्या दबावाखाली या दामपत्यावर अत्याचार केला ? पोलीस ठाण्यात कोणाचा फोन आला होता ? असे सवाल करत कारवाईची मागणी केली. त्या नंतर २३ जुलै रोजी नवघर पोलीसांनी किरण यांच्या फिर्यादी नुसार गौड, त्याचा मुलगा व अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. दरम्यान किरण यांनी या प्रकरणी थेट कोकण क्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांना लेखी तक्रार करुन अन्याय आणि अत्याचार करणाराया नवघर पोलीस ठाण्यातील संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. उपअधिक्षक वळवी हे सदर प्रकरणाची चौकशी करत आहेत. तर घटना घडली त्या दिवशी आपण रजेवर होतो. या प्रकरणी उपअधिक्षक चौकशी करत असल्याचे नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग म्हणाले.

Web Title: Spot on Khaki! Enquiry of Police personnel who beating woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.