मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात ‘स्पेशल ड्राईव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 22:38 IST2021-01-21T22:37:45+5:302021-01-21T22:38:17+5:30
Traffic Police : एकाच रात्रीत ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई

मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात ‘स्पेशल ड्राईव्ह’
ठाणे : मद्यपी वाहन चालकांना वेसण घालण्यासाठी ठाणे पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने स्पेशल ड्राईव्ह सुरू केले आहेत. बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अशा पद्धतीचे ड्राईव्ह सातत्याने सुरू राहणार आहेत. त्यात होणारी कारवाई टाळण्यासाठी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहनचालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस वाहन चालकांची तपासणी करतात. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलीस मद्यपी वाहनचालकांसह सहप्रवाशांवरही कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्री वाहतूक शाखेच्या १८ विभागांअंतर्गत विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात ७७ मद्यपी वाहनचालकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासोबतचे ३५ सहप्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. कापुरबावडी विभागाअंतर्गत सर्वाधिक १६ प्रवासी आणि ८ सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी पकडलेल्या एका मद्यपी वाहनचालकासह सहप्रवाशाला ७ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली होती. विशेष म्हणजे सहप्रवासी दारू प्यायलेला नसतानाही त्याला तुरुंगात जावे लागले होते. काही वाहनचालक आणि सहप्रवाशांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षासुद्धा कोर्टाने ठोठावलेली आहे. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे अशा पद्धतीची कारवाई सातत्याने केली जाणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.