विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 05:34 IST2025-10-07T05:33:58+5:302025-10-07T05:34:11+5:30
शूटरला नेपाळमध्ये पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप कश्यपवर आहे, तर पारधीने इतरांसह शस्त्रे आणि इतर तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे.

विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात किसन पारधी आणि अनुराग कश्यप या दोन आरोपींची जामिनावर सुटका करण्यास विशेष मकोका न्यायाधीश महेश जाधव यांनी सोमवारी नकार दिला, अशी माहिती सरकारी वकील महेश मुळे यांनी दिली.
सिद्दीकी (वय ६६), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री, यांची गेल्यावर्षी १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या वांद्रे (पूर्व) भागात त्यांच्या मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली.
शूटरला नेपाळमध्ये पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप कश्यपवर आहे, तर पारधीने इतरांसह शस्त्रे आणि इतर तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक केलेल्या तब्बल २६ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका ) अंतर्गत गुन्हे दाखल असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
कैदेत असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारी टोळीवर दहशत व दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने सिद्दीकी यांच्या हत्येची कटकारस्थान अनमोल बिश्नोईने रचली.