पणजी : हरयाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित हत्येप्रकरणी अमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती (ड्रग पेडलर) व रेस्टाॅरंट मालकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता चार झाली आहे.अमली पदार्थ विकणारा दत्तप्रसाद गावकर आणि कर्लिज रेस्टाॅरंटचा मालक एडविन न्यून्स यांना अंजुना येथे ताब्यात घेतले. गावकरने सोनाली फोगाट यांच्या दोन सहकाऱ्यांना अमली पदार्थ दिले होते. ते या दोघांनी पाण्यात मिसळून फोगाट यांना दिले. मृत्यूच्या काही तास आधी फोगाट यांनी दोन सहकाऱ्यांसह कर्लिज रेस्टांरटमध्ये पार्टी केली होती. तिथेच त्यांना कथितरीत्या अमली पदार्थ दिले होते. यापूर्वी अटक करण्यात आलेले फोगाट यांचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदरसिंग यांनी चौकशीत गावकरकडून अमली पदार्थ विकत घेतल्याचे कबूल केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावकर आणि न्यून्स यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी टिकटॉक स्टार आणि रिॲलिटी शो बिग बॉसची स्पर्धक फोगाट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात मृत्यू झाला होता.
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: रेस्टॉरंट मालक, ड्रग पेडलर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 07:08 IST