'माझं लग्न का करत नाही' असं म्हणत लेकाने केला आईचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:02 IST2019-12-12T14:59:39+5:302019-12-12T15:02:10+5:30

डोक्यात कुऱ्हाडीने घाव : खटाव तालुक्यातील मोराळे येथील घटना

Son murdered mother for saying 'why not your are not looking for my marriage' | 'माझं लग्न का करत नाही' असं म्हणत लेकाने केला आईचा खून

'माझं लग्न का करत नाही' असं म्हणत लेकाने केला आईचा खून

ठळक मुद्देझोपेत असलेल्या आईला उठवून त्याने ‘तू माझं लग्न का करत नाहीस व मला नेहमी काम का सांगतेस,’ असे म्हणत  वाद घालण्यास सुरूवात केली. जन्मदात्या आईचाच मुलाने खून केल्याने खटाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

सातारा - ‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना  गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली. 

कांताबाई शहाजी शिंदे (५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण शहाजी शिंदे (२९) याचे लग्न ठरत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. ‘माझं लग्न कर,’ असे म्हणून तो आईच्या मागे तगादा लावत होता. दरम्यान, वडील शहाजी शिंदे हे  गुरुवारी रात्री लघुशंकेसाठी झोपेतून उठले होते. घरात बाथरुम नसल्यामुळे ते घराबाहेर जात होते. याचवेळी मुलगा किरण शिंदे याने वडिलांच्या पाठीत लाथ मारून त्यांना घराबाहेर ढकलेले. त्यानंतर आतून कडी लावून घेतली. झोपेत असलेल्या आईला उठवून त्याने ‘तू माझं लग्न का करत नाहीस व मला नेहमी काम का सांगतेस,’ असे म्हणत  वाद घालण्यास सुरूवात केली. 

संतापाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता किरणने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आतून दरवाजाची कडी उघडत नसल्याने वडिलांनी शेजाऱ्यांना उठवले. त्यानंतर दरवाजा तोडून नागरिकांनी घरात प्रवेश केला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. कुऱ्हाडीसह किरणला पोलिसांनी ताब्यात घेतले.जन्मदात्या आईचाच मुलाने खून केल्याने खटाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुलावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Son murdered mother for saying 'why not your are not looking for my marriage'