जावयाचा सासऱ्याला १०७ कोटींचा गंडा; तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:43 IST2022-11-26T13:43:36+5:302022-11-26T13:43:55+5:30
अब्दुल लाहिर हसन या दुबईतील उद्योजकाच्या मुलीचे केरळमधील कासारगोड भागातल्या मुहम्मद हफीज याच्याशी २०१७ साली लग्न झाले.

जावयाचा सासऱ्याला १०७ कोटींचा गंडा; तक्रार दाखल
कोची : आपल्या जावयाने सुमारे १०७ कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार दुबई येथे स्थायिक असलेल्या एका अनिवासी भारतीय उद्योजकाने केरळ पोलिसांकडे केली आहे.
अब्दुल लाहिर हसन या दुबईतील उद्योजकाच्या मुलीचे केरळमधील कासारगोड भागातल्या मुहम्मद हफीज याच्याशी २०१७ साली लग्न झाले. गेल्या पाच वर्षांत या उद्योजकाने आपल्या मुलीला १ हजार सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले होते. सासऱ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या अनेक मालमत्ता त्याला अंधारात ठेवून जावई मुहम्मद हाफीजने स्वत:च्या नावावर केल्या.
हे सारे गैरप्रकार सासऱ्याला तीन महिन्यांपूर्वी लक्षात येताच, त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी मुहम्मद हफीज हा सध्या गोव्यात असून, या प्रकरणाचा तपास केरळ पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडे सोपविण्यात आला आहे.