पोलीसपुत्रासाठी तोडले सोसायटीचे सील; कायद्याची पायमल्ली करत रहिवाशांचे जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 00:42 IST2020-06-28T00:42:06+5:302020-06-28T00:42:23+5:30
घणसोलीत घरोंदा येथील आदर्श सोसायटीत शनिवारी एका निवृत्त पोलिसाच्या मुलाने सील तोडून फाटक उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकाला धमकावले.

पोलीसपुत्रासाठी तोडले सोसायटीचे सील; कायद्याची पायमल्ली करत रहिवाशांचे जीव धोक्यात
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सोसायटीला केलेले सील पोलिसांनीच तोडल्याचा प्रकार घणसोलीत घडला आहे. एका निवृत्त पोलीसपुत्राच्या सोयीसाठी हा प्रकार करण्यात आला आहे. यासाठी सोसायटी अध्यक्षाला पोलीस ठाण्यात बोलावून धमकावण्यात आले.
घणसोलीत घरोंदा येथील आदर्श सोसायटीत शनिवारी एका निवृत्त पोलिसाच्या मुलाने सील तोडून फाटक उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकाला धमकावले. यावेळी सुरक्षा रक्षकाने सोसायटी अध्यक्षांकडे तक्रार केली असता, त्यांनीही फाटक उघडण्यास नकार दिला. या रागातून सदर पोलीसपुत्राने रबाळे पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून अध्यक्ष विजय चव्हाण यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्या ठिकाणी आपल्याला सोसायटीचे फाटक उघडण्यासाठी धमकावण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले, परंतु संपूर्ण अधिकार पालिकेचे असल्याचे त्यांनी सांगताच, तिथे उपस्थित पोलिसाने त्या पोलीसपुत्रासाठी सोसायटीचे फाटक उघडण्याचे अधिकार दिले. यामुळे कायद्याचे रक्षकच कंटेन्मेंटच्या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे. एका व्यक्तीसाठी संपूर्ण सोसायटीतील रहिवाशांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे सोसायटीमध्ये भीती पसरली आहे.