दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवरून बेपत्ता झालेल्या स्नेहा देबनाथचा मृतदेह पोलिसांना सापडला. गीता कॉलनीच्या उड्डाणपुलाजवळ यमुना नदीतूनपोलिसांनी स्नेहाचा मृतदेह ताब्यात घेतला. गेल्या ७ दिवसांपासून पोलीस स्नेहाचा शोध घेत होते. स्नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार मेहरौली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. स्नेहा ७ जुलै रोजी तिच्या मैत्रिणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आज तिचा मृतदेह सापडला.
नक्की काय घडलं?
स्नेहा देबनाथचे कुटुंब मूळचे त्रिपुराचे आहे. स्नेहा दक्षिण दिल्लीतील मेहरौली पोलिस स्टेशन परिसरातील पर्यावरण कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. ७ जुलै रोजी ती तिच्या आईला सांगून घरातून निघाली की ती तिची मैत्रीण पटुनियाला स्टेशनवर सोडायवा जात आहे. कॅब ड्रायव्हरने स्नेहाला दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवर सोडले. त्यानंतर ती तिथून बेपत्ता झाली. कुटुंबाने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेही सापडली नाही.
शेवटचे ठिकाण सिग्नेचर ब्रिज
काही काळ वाट पाहून ९ जुलै रोजी त्यांनी मेहरौली पोलिस ठाण्यात स्नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्नेहाचा शोध सुरू केला. यमुना नदीत पोलीस तिचा सतत शोध घेत होते. बेपत्ता होण्यापूर्वी तिने घरात एक सुसाईड नोटही सोडली होती, ज्यामध्ये तिने आत्महत्या करण्याबद्दल लिहिले होते. मेहरौली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्नेहाचे शेवटचे ठिकाण सिग्नेचर ब्रिजवर सापडले.
यमुना नदीतून मिळाला स्नेहाचा मृतदेह
रविवारी गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळील यमुना नदीतून पोलिसांना एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख स्नेहा अशी झाली, जी ७ दिवसांपासून बेपत्ता होती. मृतदेह सापडल्यापासून कुटुंबाला धक्काच बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.