मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 05:53 IST2025-07-08T05:53:29+5:302025-07-08T05:53:59+5:30
दुबई येथून आलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे दीड कोटींचे सोने आढळले.

मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
मुंबई : मुंबईविमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन स्वतंत्र प्रकरणांत अमली पदार्थ, दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आणि सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या तिन्ही प्रकरणांत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या मोहम्मद रोशन शेखर या प्रवाशाकडे ९ किलो ६६ ग्रॅम गांजा आढळला. दुसऱ्या प्रकरणात बँकॉक येथूनच आलेल्या आणखी एका प्रवाशाचा संशय आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्या बॅगेत काही दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आढळले. यापैकी तीन प्राणी मृत झाले होते. यानंतर हे प्राणी ताब्यात घेत त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले. तिसऱ्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला. दुबई येथून आलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे दीड कोटींचे सोने आढळले. हे सोने त्यांनी बॅगेतील चोरकप्प्यात ठेवले होते.