स्मोक डिटेक्टरने दुर्घटना टळली; नर्सिंग रुममध्ये दिव्याने पेटला कागद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:44 IST2021-11-11T18:43:28+5:302021-11-11T18:44:31+5:30
Smoke detectors averted accidents : नर्सिंग रुममधील दिव्याच्या बाजूला कागद असल्याने तो पेटला. त्याचा धूर शिशुगृह विभागात पसरल्याने रुग्णालयात आग लागल्याची चर्चा सगळीकडे पसरली.

स्मोक डिटेक्टरने दुर्घटना टळली; नर्सिंग रुममध्ये दिव्याने पेटला कागद
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागातील स्टाफ नर्सच्या पर्सनल रुममधील देवापुढे लावलेल्या दिव्यामुळे गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कागद पेटला व धूर झाला. याचवेळी स्मोक डिटेक्टरचा अलार्म वाजल्याने सुरक्षा रक्षकांनी धाव घेत दिवा व पेटलेले कागद विजविले. यामुळे पुढील दुर्घटना टळली. नर्सिंग रुममधील दिव्याच्या बाजूला कागद असल्याने तो पेटला. त्याचा धूर शिशुगृह विभागात पसरल्याने रुग्णालयात आग लागल्याची चर्चा सगळीकडे पसरली. दरम्यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
तेथे बंब पोहोचण्यापूर्वीच शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी नळकांड्या फोडून दिव्याला व कागदाला लागलेली आग आटोक्यात आणली. यावेळी धूर पसरला होता. त्यामुळे रुग्णालय विभागाने शिशुगृहातील २७ बालकांना सुरक्षित स्थळी हलविले. विशेष म्हणजे स्टाफ नर्सची दिवा लावलेली पर्सनल रुम लॉक केलेली होती. सुरक्षा रक्षकांनी धूर आल्याने ती लॉक तोडून आत प्रवेश करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी एस.जे. शेख व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, दुर्घटनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळविल्याने अग्निशमन दलाच्या पथकाला परत पाठविण्यात आले.
दिवा प्रकरणाची चौकशी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्मोक डिटेक्टर आणि अलार्मने धोक्याची घंटा कळल्याने अनर्थ टळला असला तरी नर्सिंग रुममध्ये दिवा कोणी व का लावला? तसेच नेमका प्रकार कसा घडला? याची चौकशी केली जाईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी सांगितले.