बापरे! बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला; श्वानांनी तोडले लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 20:21 IST2021-05-27T20:20:22+5:302021-05-27T20:21:31+5:30
Crime News : १७ मेपासून सोडले होते घर

बापरे! बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला; श्वानांनी तोडले लचके
यवतमाळ : येथील जाम रोड परिसरातील मुलकीमध्ये गुरुवारी सकाळी एका मानवी कवटी आढळून आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण सांगाडाच शोधण्यात आला. तो सांगाडा वडगाव येथील ७५ वर्षीय वृद्धाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मुकिंदा हिरामन वाघमारे (७५) रा. वडगाव हे १७ मेपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी लगतच्या मुलकी भागात मानवी कवटी आढळून आली. या कवटीचा आधार घेत पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता मानवी सांगाड्याचे अवशेष इतरत्र आढळून आले. याच भागात काही कपडेही मिळाले. दाखल मिसिंगच्या आधारे वाघमारे कुटुंबीयांना पाचारण करण्यात आले. कपडे व इतर परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांनी मुकिंदा वाघमारेच असल्याची खात्री व्यक्त केली.
घराच्या वाटणीच्या वादातून सख्या भावाची थोरल्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण; जागीच मृत्यूhttps://t.co/xyhFfqNlqX
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2021
मुकिंदा वाघमारे घरुन निघून गेल्यानंतर त्यांचा नेमका मृत्यू कशाने झाला, हे अद्याप उलगडू शकले नाही. परिसरातील श्वानांनी या मृतदेहाचे लचके तोडून केवळ सांगाडाच शिल्लक ठेवला. आता डीएनए चाचणीच्या माध्यमातून पोलिसांकडून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मृतक व त्याच्या कुटुंबीयातील सदस्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. बेवारस सापडलेल्या मानवी कवटीचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा लावत कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.