मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:03 IST2025-07-31T12:55:13+5:302025-07-31T13:03:17+5:30
Sangita Chakraborty Death: पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला.

मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी
Sangita Chakraborty Death: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत धक्कादायकरित्या मृत्यू झाला. गायिकेचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झालेल्या विविध चर्चा सुरु झाल्या आहे. मृत गायिका मुंबईतील एका आश्रमात राहत होती. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी तिच्या कुटुंबाला फोनवरून तिचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली, नंतर तिच्या मृत्यूची बातमी आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, धरणाच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला, मात्र या घटनेने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रहिवासी असलेली गायिका संगीता चक्रवर्तीचा मुंबईत मृत्यू झाला. मृत संगीता मुंबईतील मनाडी परिसरातील एका योग आश्रमात राहत होती. संगीताच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संगीता चक्रवर्तीच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढत चालले आहे. संगीताच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार आणि नगरसेवक इंद्रजित दत्त यांनी पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
आमदार असित मुजुमदार यांनी सांगितले की स्थानिक नेत्यांनी संगीताच्या मृत्यूची माहिती दिली. आमच्या परिसरातील एका मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ती मुलगी मुंबईतील संगीत उद्योगाशी संबंधित होती, असं आमदार असित मुजुमदार यांनी म्हटलं. असित मजुमदार यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गायिकेच्या मृत्यूचे कारण समोर आणावं अशी मागणी केली आहे.
तृणमूलच्या नेत्यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून संगीताच्या वडिलांशी फोनवर चर्चा केली. संगीताचे वडील तिचा मृतदेह घेऊन मुंबई विमानतळावरुन हुगळीसाठी रवाना झाले आहेत. ती स्वभावाने खूप सौम्य आणि सुसंस्कृत होती. तिला गाणे आणि वादन करण्याची आवड होती आणि तिने अनेक स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. धरणामध्ये आंघोळ करताना ती पाण्यात बुडाली, पण ही घटना कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संगीता एक हुशार आणि प्रतिभावान मुलगी होती. तिच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक शंका निर्माण होत आहेत, असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले.