गोळी लागली तरी सोडलं नाही; वीज कर्मचाऱ्याने हल्लेखोराचा 'नकली पाय;च उपटला, पिस्तुल घेऊन थेट पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:06 IST2025-12-12T17:06:29+5:302025-12-12T17:06:46+5:30
मध्य प्रदेशात एका वीज कर्मचाऱ्याने गोळी लागल्यानंतरही पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली

गोळी लागली तरी सोडलं नाही; वीज कर्मचाऱ्याने हल्लेखोराचा 'नकली पाय;च उपटला, पिस्तुल घेऊन थेट पोलीस ठाण्यात
MP Crime : मध्य प्रदेशातील सतना शहरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच अचंबित केले आहे. वीज मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला लुटण्याच्या इराद्याने गोळी मारण्यात आली, मात्र त्या ६० वर्षीय कर्मचाऱ्याने दाखवलेल्या अविश्वसनीय शौर्यामुळे हल्लेखोराला आपले प्राण वाचवण्यासाठी पळून जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे, पळताना तो त्याचा कृत्रिम पाय आणि अवैध पिस्तूल घटनास्थळीच सोडून गेला.
गोळीबारात जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याचे नाव रामनरेश वर्मा (वय ६०) असून, ते मूळचे अमदरा येथील नौगावचे रहिवासी आहेत आणि सतना येथील विद्युत विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी आपली ड्यूटी संपवून रामनरेश रोजच्याप्रमाणे रेल्वे पकडण्यासाठी पायी स्टेशनकडे जात होते. प्रेम नगर अंडरब्रिजजवळ अंधाराचा फायदा घेऊन एका दिव्यांग (एक पाय नसलेल्या) व्यक्तीने त्यांना अडवले. लूटण्याच्या इराद्याने या हल्लेखोराने थेट रामनरेश यांच्या छातीवर कट्टा ठेवून गोळी झाडली. गोळी थेट त्यांच्या डाव्या छातीत घुसली.
छातीतून रक्तस्राव होत असतानाही रामनरेश यांनी हार मानली नाही. वेदना विसरून त्यांनी मोठ्या धैर्याने हल्लेखोरावर झेप घेतली. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीदरम्यान हल्लेखोर खाली पडला. रामनरेश यांनी याच संधीचा फायदा घेत त्याचा कट्टा हिसकावून घेतला आणि त्याचा कृत्रिम पाय उपटून काढला. आपला पाय आणि पिस्तूल दोन्ही पडल्यामुळे घाबरलेला हल्लेखोर, एका पायाने लंगडत, मिळेल त्या वाटेने पळून गेला.
'पाय' आणि 'पिस्तूल' घेऊन पोलीस ठाणे गाठले
यानंतर रामनरेश यांनी जे काही केले ते अविश्वसनीय आणि थरारक होते. छातीत गोळी लागलेली असताना, रक्त वाहत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी हल्लेखोराचा कृत्रिम पाय आणि पिस्तूल आपल्या पिशवीमध्ये भरले आणि त्याच अवस्थेत पायी चालत थेट पोलीस ठाणे गाठले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत आलेल्या या वयोवृद्ध व्यक्तीला पाहून पोलीस कर्मचारी चक्रावून गेले. रामनरेश यांनी जेव्हा पिशवीतून नकली पाय आणि पिस्तूल बाहेर काढले, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना ही घटना कळली.
पोलिसांनी तात्काळ रामनरेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा कृत्रिम पाय आणि पिस्तूल ताब्यात असल्याने पोलिसांनी एका पायाच्या फरार आरोपीचा शोध त्वरित सुरू केला.
तपासणीदरम्यान, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. फुटेजमध्ये आरोपी एका पायाने लंगडत पळून जाताना स्पष्टपणे दिसत होता.
रामनरेश यांच्याकडून मिळालेले सुगावे, घटनास्थळाचे आणि मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, यामागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. रामनरेश वर्मा यांच्या धाडसाचे आणि शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.