खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 21:27 IST2021-06-06T21:27:43+5:302021-06-06T21:27:53+5:30

जुन्या वैरातून ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या दीपक सोनवणे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदार रवींद्र तागुंदे याच्यावर शनिवारी गोळीबार करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Shooting at construction contractor to revenge murder in pune | खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : जुन्या वैरातून ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या दीपक सोनवणे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदार रवींद्र तागुंदे याच्यावर शनिवारी गोळीबार करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला पकडले आहे. अभिजित तुकराम येलवांडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नकुल श्याम खाडे, चेतन चंद्रकांत पवार आणि उमेश चिकणे यांच्याबरोबर मिळून येलवांड याने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. वारजे पोलिसांनी याप्रकरणातील आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

रवींद्र तांगुदे यांच्यावर वारजे येथील डुक्कर खिंडीजवळ शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांपैकी एकाने पिस्तुलातून ४ गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यातून तागुंदे हे बचावले.

पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना तांगुदे यांच्यावर हल्ला करणारा अभिजीत येलवांडे हा गोसावी वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विराधी पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, अंमलदार राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितनी रावळ, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांनी सापळा रचून येलवांडे याला पकडले. त्याने चौकशीत दीपक सोनवणे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली दिली. येलवांडे याच्यावर यापूर्वीचे ४ गुन्हे दाखल आहेत. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली.

कर्वेनगरमधील महावीर ओव्हाळ आणि दीपक सोनवणे यांच्यामध्ये वैर होते. त्यातून दीपक सोनवणे व त्याच्या दोन भावांनी ओव्हाळ याच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात वारजे पोलिसांनी दीपक सोनवणे व त्याच्या भावांना अटक केली होती. दीपक सोनवणे हा जामीनावर सुटून आल्यावर महावीर ओव्हाळ व इतरांनी केलेल्या हल्ल्यात दीपक सोनवणे (वय २६, रा. सुयोगनगर, वारजे) याचा खुन झाला होता. त्यात ओव्हाळ, रवींद्र तागुंदेसह पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. या खटल्यातून रवींद्र तागुंदे याची निर्दोष सुटका झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Shooting at construction contractor to revenge murder in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.