धक्कादायक! मुंबईत 45 वर्षीय महिलेचा संशयास्पदरीत्या सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:19 IST2018-10-04T15:53:27+5:302018-10-04T16:19:35+5:30
मृत महिला कुठेही काम करत नव्हती. मात्र, महिला फॅशन डिझायनर असल्याचे समजते. आज दुपारी याबाबत ओशिवरा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.

धक्कादायक! मुंबईत 45 वर्षीय महिलेचा संशयास्पदरीत्या सापडला मृतदेह
मुंबई - अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरात ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरात आढळला आहे. क्रॉस गेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत महिलेचा मृतदेह आढळला आहे. मयत महिलेचे नाव सुनीता सिंग (वय ४५) असं असून तिच्या मुलाला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यांनी पुढे सांगितले की, मृत महिला कुठेही काम करत नव्हती. मात्र, महिला फॅशन डिझायनर असल्याचे समजते. आज दुपारी याबाबत ओशिवरा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडरूममध्ये तिचा मृतदेह आढळला असून तिच्या बाजूला इंजेक्शनच्या सिरीन सापडल्या आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे उघड होईल. याप्रकरणी तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस सध्या चौकशी करत आहेत. मृत महिलेचा मुलगा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एका मुलीसोबत राहत असून आई आणि मुलगा दोघांनाही अमली पदार्थाचे व्यसन होते. अलीकडेच ओशिवरा येथील मालकी हक्काचा फ्लॅट सुनीता यांनी विकला होता. त्यातून मिळालेल्या पैशावरूनच हा आई आणि मुलात वाद झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. क्रॉस गेट या इमारतीत सिंग कुटुंबीय भाडेतत्वावर राहत आहेत.