धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:45 IST2025-12-10T13:44:29+5:302025-12-10T13:45:10+5:30
वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला.

धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न एका ३० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, हरिज्ञान सिंह नावाच्या या पीडित तरुणाला मध्यस्थांनी दोन वेगवेगळ्या महिलांशी लग्न लावले, पण लग्नानंतर काही तासांतच दोन्ही नववधू दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्या.
दिल्लीतील एका हॉटेलमध्ये नोकरी करणारा हरिज्ञान सिंह आयुष्यात एकटी पडलेली पत्नीची जागा भरून काढण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला वाटले होते की तो लवकरच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करेल, म्हणून त्याने आपल्या पैशाची पर्वा न करता आपली जमीन विकून टाकली. या विक्रीतून मिळालेले ४.५ लाख रुपये त्याने लग्नाच्या तयारीसाठी वापरले. पण, लग्नाच्या नावाखाली गावकऱ्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्याला आपला पैसा, दागिने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनःशांती गमवावी लागली.
एक रात्र राहिली आणि दागिने घेऊन पसार
हरिज्ञानला लग्न करण्यासाठी गावातील एका दाम्पत्याने आणि एका अन्य तरुणाने गाठले. लग्नाचे आश्वासन देत त्यांनी हरिज्ञानकडून पहिल्यांदा १.२० लाख रुपये घेतले. मध्यस्थांनी त्याचे बुलंदशहर येथील गीता नावाच्या महिलेशी लग्न लावले. हरिज्ञानने मोठ्या थाटामाटात लग्न केले, पण त्याचे हे सुख फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या एका रात्रीत, पहाटे ४ च्या सुमारास, गीता सोन्याचे झुमके, चांदीचे पैंजण आणि अन्य दागिने घेऊन घरातून फरार झाली.
पैसे परत मागण्यासाठी हरिज्ञान आणि त्याचा भाऊ राजू मध्यस्थांकडे गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले, पण गावकऱ्यांच्या मध्यस्थीने ते शांत झाले.
दीड लाखांना घातला गंडा, 'बहिणी'सोबत झाली गायब!
पहिल्या फसवणुकीनंतर हरिज्ञान सावरत असतानाच, चार महिन्यांनी तेच मध्यस्थ पुन्हा आले. यावेळी त्यांनी हरिज्ञानला पुन्हा एकदा लग्नाचे आमिष दाखवले. दुसऱ्या लग्नासाठी त्यांनी हरिज्ञानकडून पुन्हा १.५० लाख रुपये उकळले. यावेळी हरिज्ञानचे लग्न बुलंदशहर येथील रिंकू देवी नावाच्या महिलेशी लावले.
पुन्हा एकदा हरिज्ञान नवरदेव बनला, पण रिंकूही त्याच्यासोबत फार काळ राहिली नाही. अवघे तीन दिवस सोबत राहिल्यानंतर रिंकूने अशक्तपणाचे कारण सांगितले. ती तिचा कथित 'भाऊ' असल्याचे सांगणाऱ्या एका तरुणासोबत दिल्लीला जाण्याचा बहाणा करून घरातून निघाली. जाताना तिने घरात असलेली रोकड, दागिने आणि काही मौल्यवान वस्तू सोबत नेल्या. त्यानंतर ती सासरी परतलीच नाही, किंवा तिच्या माहेरचाही पत्ता लागला नाही.
पोस्टर घेऊन रस्त्यावर, 'माझी बायको परत मिळवून द्या'!
या दोन्ही घटनांमध्ये हरिज्ञानचे एकूण २.७० लाख रुपये फसवणुकीत गेले. जमीन विकून मिळालेले पैसेही लग्नाच्या खर्चात आणि फसवणुकीत वाया गेले. या दोन्ही तथाकथित वधू दागिने आणि रोकड घेऊन फरार झाल्यामुळे हरिज्ञानवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
सतत पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, निराश झालेल्या हरिज्ञानने एक अनोखे पाऊल उचलले आहे. त्याने एक पोस्टर बनवले आहे, ज्यावर स्पष्ट लिहिले आहे—‘मला माझी बायको परत मिळवून द्या!’ हे पोस्टर हातात घेऊन तो अलीगढच्या रस्त्यांवर फिरत आहे. हरिज्ञानची एकच मागणी आहे: "माझी जमीन गेली, माझे पैसे गेले, पण निदान मला माझी पत्नी तरी परत मिळवून द्या. मला फक्त न्याय हवा आहे."
तपास सुरू; दोषींवर होणार कारवाई!
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार हरिज्ञानने एसएसपी नीरज जादौन यांच्याकडे केली आहे. सीओ गभाना धनंजय सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, 'या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,' असे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापपर्यंत दोन्ही फरार वधू आणि मध्यस्थ-दाम्पत्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही.