धक्कादायक! करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या वकिलानेच घडविला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:22 IST2019-06-01T14:19:43+5:302019-06-01T14:22:48+5:30
तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं आहे.

धक्कादायक! करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या वकिलानेच घडविला हल्ला
मुंबई - अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गेल्या शनिवारी काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. मात्र, हा हल्ल्या तक्रारदार महिलेच्यात वकिलाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलेला सहानुभूती मिळावी याकरिता तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं आहे.
तक्रारदार महिलेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिशान अन्सारी (२३) अल्तमाश ( २२) जितीन संतोष कुरीयन (२२) आणि अराफत अहमद अली (२२) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळेजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक झालेल्यापैकी अराफत अली हा महिलेचा वकील अली काशिफ खानचा नातेवाईक असून खाननेच महिलेवर हल्ला करण्याचे काम दिले असल्याचे अराफतने पोलिसांना सांगितले. तसेच या हल्ल्यासाठी वकील अली काशिफ खानने आपल्याला पैसेही दिले होते असे पुढे अराफतने पोलिसांना सांगितले आहे.
अटक केलेल्यांपैकी अन्सारी आणि अल्तमाश हे महिलेला प्रत्यक्ष मारहाण करण्यात सहभागी नव्हते. मात्र ते हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला मॉर्निंगवॉकला जात असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांपैकी जितीन कुरिअनने महिलेच्या अंगावर ऍसिड ओतण्याची धमकी दिली होती. करणविरोधातील खटला मागे घे असं हल्लेखोर तक्रारदार महिलेला धमकावत होते अशी तक्रार या महिलेने पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामागचा उद्देश आता स्पष्ट झाला असून पोलीस सध्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या अली काशिफ खान या वकिलाला शोधत आहेत.