धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 18:29 IST2023-01-01T18:29:30+5:302023-01-01T18:29:47+5:30
एकीकडे राजधानी दिल्लीत नववर्षाची सुरुवात अन् दुसरीकडे तरुणीची निर्घृण हत्या.

Demo Photo
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असताना कारमधील 5 तरुणांनी स्कूटीवरुन घरी जाणाऱ्या एका तरुणीला त्यांच्या कारनं उडवलं आणि चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. डीसीपी हरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, आज, रविवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना कांजवाला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक जखमी तरुणी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. शरीराचा बराचसा भाग रस्त्यावर घासून-घासून गायब झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि समजले की, ही 23 वर्षीय तरुणी स्कूटीवरून आपल्या घरी जात होती, तेव्हा एका कारमधील पाच मुलं तिथून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यानंतर आरोपींनी आपल्या कारनं तरुणीला सुलतानपूर ते कांझावाला परिसरात सुमारे 4 किलोमीटरपर्यंत ओढत नेलं. यादरम्यान मुलीच्या अंगावरील कपडे फाटून निघाले, शरीरावर गंभीर जखमा झाल्या.
तपासाअंती पोलिसांनी पाच आरोपी तरुणांना मुलांना पकडलं असून कार जप्त करण्यात आली आहे. कारमधील मुलांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. ही मुलं दारुच्या नशेत होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सध्या तरी पोलिसांना या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही मिळालेले नाहीत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.