खळबळजनक! जमिनीच्या वादातून चुलत भावाला ट्रॅक्टरखाली चिरडले; जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 15:20 IST2020-11-03T13:23:38+5:302020-11-03T15:20:22+5:30
जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाच्या अंगावर भर चौकात ट्रॅक्टर घालून त्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खळबळजनक! जमिनीच्या वादातून चुलत भावाला ट्रॅक्टरखाली चिरडले; जुन्नरमधील घटना
पुणे: पैसे, जमीन, मालमत्ता यांच्यापुढे माणूस रक्ताच्या नात्यांना देखील संपवायला मागे पुढे पाहत नाही. याचाच ज्वलंत अनुभव देणारी आणि क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे घडली. जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाच्या अंगावर भर चौकात ट्रॅक्टर घालून त्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या घटनेत प्रकाश नामदेव मनसुख (वय-५८) असे मृत्यू ;झालेल्या भावाचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जयनाथ सोपान मनसुख याला अटक करत त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील जयेश सोपान मनसुख ( वय ४०) हा शेती व ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो.त्याचा चुलतभाऊ प्रकाश नामदेव मनसुख (वय ५८ )हे व्यवसायानिमित्त मुंबई व गावी असतात. या दोन चुलत भावांमध्ये शेतीच्या शेती वरून वाद होते. सोमवारी( दि.२ ) सायंकाळी सावरगाव जवळच्या एकनाथवाडी येथील मुख्य चौकात जयेश व प्रकाश समोरासमोर आले. त्याचवेळी जयेशने प्रकाश यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. जखमी अवस्थेत प्रकाश यांना सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु प्रकाश याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
जुन्नरचे पोलीस व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.