धक्कादायक! ‘ऑन ड्युटी’ पोलिसाच्या अंगावर घातली कार; संबंधित कारचालकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:11 IST2025-06-02T13:09:23+5:302025-06-02T13:11:56+5:30

याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष दत्तू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे

Shocking! Car hits 'on-duty' policeman; Search underway for driver | धक्कादायक! ‘ऑन ड्युटी’ पोलिसाच्या अंगावर घातली कार; संबंधित कारचालकाचा शोध सुरू

धक्कादायक! ‘ऑन ड्युटी’ पोलिसाच्या अंगावर घातली कार; संबंधित कारचालकाचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती: ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २९ मे) रोजी बारामतीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, संबंधित कारचालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष दत्तू कांबळे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

बारामती तालुका पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत असलेले कांबळे हे २९ मे रोजी ऑन ड्युटी होते. यावेळी तालुका पोलिस ठाण्याजवळ एका  बेकरीसमोर काळ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या कारचा चालक रस्त्यावर स्टंट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कांबळे हे घटनास्थळी पोहोचले. 

अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल

  • पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी ही गाडी लॉक केल्याचे त्यांना दिसून आले. परिसरात चौकशी करत असताना, एक २४ वर्षे वयाचा तरुण त्यांच्याजवळ आला. 
  • पोलिसांनी त्याला नाव विचारले असता, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. तसेच, त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत एकेकाला गाडीखाली घेऊन जीव घालवेन, अशी धमकी दिली. 
  • त्याने गाडीमध्ये बसून गाडी मागे घेत फिर्यादीला जोराची धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या अंमलदारांनी चालकास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरील बाजूने गाडी अंगावर घालत तो जोरात तेथून निघून गेला. कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Shocking! Car hits 'on-duty' policeman; Search underway for driver