धक्कादायक! नक्षलवाद्यांकडून दोघांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:43 IST2019-12-02T19:42:16+5:302019-12-02T19:43:33+5:30
हत्ती कॅम्पमध्ये तोडफोड; रस्ताही अडवला

धक्कादायक! नक्षलवाद्यांकडून दोघांची निर्घृण हत्या
एटापल्ली/कमलापूर(गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची रविवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे कमलापूर हत्ती कॅम्पमध्येही तोडफोड करत आणि मार्ग अडवत बॅनरबाजी केली. पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने दुर्गम भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मासो डेबला पुंगाटी (५५) व ऋषी लालू मेश्राम (५०) अशी हत्या झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. मासो हा पुरसलगोंदी येथील गाव पाटील आहे तर ऋषी हा कृषीमित्र म्हणून गावात काम करीत होता. रविवारच्या रात्री ७० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी सर्वप्रथम गावाला घेराव घातला. त्यानंतर दोघांनाही झोपेतून उठवून दोघांचेही हात बांधले. त्यांच्या घरातील कागदपत्रे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. दोघांच्याही कुटुंबियांनी प्रचंड विरोध केला मात्र त्यांना घरात कोंडून ठेवले. मारहाण करीतच त्यांना गावाबाहेर नेले. त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. जवळच एक चिठ्ठी टाकली होती. या दोघांनीही सुरजागड लोहप्रकल्पासाठी पैसे घेतले व ते त्या कामावर जात होते, तसेच ते पोलिसांचे खबरी होते, असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासो पुंगाटी हे नक्षल समर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. ते दोघेही सुरजागडच्या खाणीत कामावर जात असल्याचा राग मनात धरून नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी कळविले. २ ते ८ डिसेंबरपर्यंत नक्षलवाद्यांकडून पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) या नक्षल संघटनेचा वर्धापन दिन सप्ताह पाळला जात आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी हा धुमाकूळ घातल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
नक्षलवाद्यांना नको पर्यटन विकास
कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पच्या परिसरातही नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भागात वनविभागाकडून १० हत्तींचे संगोपन केले जाते. याशिवाय नव्यानेच काही सिमेंटचे हत्ती, तथा पर्यटकांना माहिती देणारे फलक लावले होते. ते नक्षलवाद्यांनी तोडले. एकेकाळी कमलापूर हे नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. पण आता कमलापूरवासियांनी हत्ती कॅम्पला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून पर्यटकांसाठी सुविधा देण्याची मागणी केली. शासनाने ते काम सुरूही केले होते. परंतू नक्षल्यांच्या तोडफोडीमुळे बरेच नुकसान झाले. कोलामरका अभयारण्य व कमलापूर तलावाला पर्यटनस्थळ बनविण्याचा विरोध करा, असे आवाहन करणारी पत्रके नक्षल्यांनी तिथे टाकली आहेत. तसेच कमलापूर-दामरंचा मार्गावर झाडे तोडून रस्ता अडविला. तिथे बॅनरही लावल्याचे आढळले.
नैराश्यातून नक्षलवाद्यांचे कृत्य
अलिकडे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांना घातपाती कारवाया करण्यात यश आले नाही. नागरिकांनी त्यांना न जुमानता भरघोस मतदान केले. अनेक नक्षली नेते आणि दलम सदस्य पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. सामान्य आदिवासींचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न नक्षलवादी करत आहेत. त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. - शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक