आयुर्वेदिक औषधात विष मिसळून केली बॉयफ्रेंडची हत्या; कारण समजताच बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:43 IST2025-01-18T12:42:10+5:302025-01-18T12:43:57+5:30
शेरोन राजच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रीष्माच्या आईच्या निर्दोष सुटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

फोटो - zeenews
केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी ग्रीष्मा नावाच्या एका तरुणीला १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आयुर्वेदिक औषधात विष मिसळून तिच्या बॉयफ्रेंड शेरोन राजला मारल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. ११ दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी शेरोनचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीची आई निर्दोष सुटली, तर तिच्या काकालाही दोषी ठरवण्यात आलं. शनिवारी, न्यायालय ग्रीष्मा आणि तिच्या काका दोघांनाही शिक्षा सुनावणार आहे.
निकालावर शेरोन राजच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रीष्माच्या आईच्या निर्दोष सुटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्हाला खात्री होती की तिला (ग्रीष्मा ) शिक्षा होईल. आम्ही शिक्षेची वाट पाहू आणि नंतर तिच्या आईच्या निर्दोष सुटकेला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ. हे म्हणताना शेरोनच्या पालकांचे डोळे पाणावले.
"तिने आमच्या मुलाचा जीव घेतला, जो आमचा जीव होता" असं आई म्हणाली आणि ग्रीष्माला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. ग्रीष्मा आणि शेरोन खूप चांगले मित्र होते, पण ग्रीष्माचा दुसऱ्याशी साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार, तिला शेरोनसोबतचं तिचं नातं संपवायचं होतं, कारण तिचा पहिला पती मरेल अशा ज्योतिषाच्या भाकितावर तिचा विश्वास होता आणि त्यामुळे तिला शांततेत दुसरं लग्न करायचं होतं.
व्हॉट्सएप मेसेजेसवरून असं दिसून आलं की, तिचा या भविष्यवाणीवर विश्वास होता, जी शेरोनने चुकीचा असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांचा दावा आहे की, त्याने वेट्टुकाडू चर्चमध्ये ग्रीष्माशी लग्न केलं होतं. पोलीस कोठडीत ग्रीष्माने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या प्रकरणाने आणखी एक नाट्यमय वळण आलं, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तिचा जीव वाचला.