अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी मुलीला १४ दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 22:03 IST2021-11-15T22:02:19+5:302021-11-15T22:03:19+5:30
Crime News :पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहरातील भूषण मनोहर बोरसे (२५) या विवाहित तरुणासह दोन मुलीवर बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला होता.

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी मुलीला १४ दिवसांची कोठडी
मलकापूर (बुलडाणा) : मलकापूर (जि.बुलडाणा) येथील बहुचर्चीत १५ वर्षीय मुलीवर झालेल्या अतिप्रसंग प्रकरणातील आरोपी २३ वर्षीय मुलीस पोलिसांनी सोमवारी अटक केली. तिला जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मुख्य आरोपी जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे, हे विशेष..!
शहरातील एका भागातील १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहरातील भूषण मनोहर बोरसे (२५) या विवाहित तरुणासह दोन मुलीवर बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला होता. तर मुख्य आरोपी भूषण बोरसे याला अटक केली. त्याला आधी पोलीस कोठडी मग न्यायालयीन कोठडीत ठेवल्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. या प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी आरोपी २३ वर्षीय मुलीला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तिच्याजवळून मोबाइल ताब्यात घेऊन तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी मुलीस २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे यांनी दिली.
महिन्याभरापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणात मुख्य आरोपी भूषण बोरसे जिल्हा कारागृहात आहे. त्यामुळे गुन्ह्यात सहभागी इतर मुलींविषयी चर्चा होती. सोमवारी एकीस अटक झाली. दुसरी मुलगी बालवयोगटात मोडत असल्याने तिच्यावरील कारवाईबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात आणखी काही प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.