मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:10 IST2019-10-16T21:05:02+5:302019-10-16T21:10:55+5:30
चार मुलींची सुटका केली असून दोघांना जेरबंद केले आहे.

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा
मुंबई - पश्चिम उपनगरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अलीकडेच वर्सोवा पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार मुलींची सुटका केली असून दोघांना जेरबंद केले आहे.
अंधेरी येथील वर्सोवा येथे रिफ्रेश वेलनस नावाच्या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांच्या विशेष पथकाने एक बनावट ग्राहक पाठवले. या बनावट ग्राहकाने तेथे असलेल्या नेहा आणि मोहम्मद रफिक यांच्याकडे तरुणींची मागणी केली. त्यांनी चार तरुणी दाखवून त्याच्याकडून ४ हजार रुपये घेतले. या बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून या चार तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. मोहम्मद रफिकसह एका महिला या तरुणींना ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे उघडकीस आले. या दोघांनाही पोलिसांनी पिटा (PITA ) कायद्यांतर्गत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुटका केलेल्या चार तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
महिलेला याआधी केले होते अटक
अटक महिला अशाच एका गुन्ह्यात आंबोली पोलिसांनी अटक केल्याचे उघड झाले. सध्या जामिनावर असलेल्या महिलेला पिटा कायाद्यांतर्गत दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे. या गुन्ह्यातील अन्य काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.