‘सीआययू’ अधिकाऱ्यांसह सात जणांची चौकशी, एनआयएकडून तिसऱ्या दिवशीही झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST2021-03-17T02:31:48+5:302021-03-17T07:00:32+5:30
गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे.

‘सीआययू’ अधिकाऱ्यांसह सात जणांची चौकशी, एनआयएकडून तिसऱ्या दिवशीही झाडाझडती
मुंबई : स्फाेटक कारप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण सात पोलिसांची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी चौकशी केली. गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे सहायक निरीक्षक रियाझ काझी व प्रशांत होवाळे आणि अन्य तिघांवर अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला आहे. त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. साेबतच विक्रोळी पोलीस ठाण्यातील दोन पाेलीस अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चाैकशी सुरू होती.
गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारीला स्काॅर्पिओ हरवल्याची तक्रार दाखल केलेल्या विक्रोळी पोलीस ठाण्यातील ड्यूटी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बाेलावण्यात आले होते. गाडीची कागदपत्रे न तपासता तक्रार कशी घेतली, त्यासाठी वाझे यांनी दबाव टाकला होता का, की अन्य कोणा अधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या, याबाबत त्यांचे जबाब घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘त्या’ वाहन चालकांची ओळख पटली
- अंबानींच्या निवासस्थानी कार ठेवणे, तसेच त्यांच्यासाेबत इनोव्हा घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचा तपास पथकाने शोध घेतला.
- ते ‘सीआययू’मधील दोघे कॉन्स्टेबल असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.