मालकिणीला गुंगीचे औषध देऊन नोकराने घातला कोटींचा गंडा; अडीज वर्षांनी ठग अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 22:16 IST2019-10-15T22:13:30+5:302019-10-15T22:16:19+5:30
मालकाच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन दुकानातील १ कोटी ३१ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला.

मालकिणीला गुंगीचे औषध देऊन नोकराने घातला कोटींचा गंडा; अडीज वर्षांनी ठग अटकेत
मुंबई - बोरिवली येथील ज्वेलर्स दुकानाचा मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेऊन नोकराने मालकिणीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १.३१ कोटी रुपयांची लूट केल्याची घटना एप्रिल २०१७ मध्ये घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल अडीच वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मनिष देवीलाल दर्जी (३२) असं या आरोपीचं नाव आहे. मनिषवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा गुन्हा बोरिवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील सुत्रधार असलेला मनीष चोरीच्या ऐवजासह बेपत्ता झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असल्याने तो आपली ओळख बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या कक्ष - १२ चे पोलीस करीत असताना त्यांना यातील मुख्य आरोपी मनीष हा मालाड पूर्व येथील डायमंड मार्केटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मनीषने गुन्ह्याची कबुली दिली. मनिषने या पूर्वी दिंडोशी, नवघर, विलेपार्ले, व्ही. पी. रोड, धारावी परिसरात याच पद्धतीने चोरी केल्या असून त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत.
मूळ राजस्थानचा रहिवासी असलेला मनिष आणि त्याचे साथीदार दरवर्षी परिसरातील एका ज्वेलर्स दुकानाची माहिती काढून त्यांच्या टोळीतील एकाला त्यांनी रेकी केलेल्या ज्वेलर्स शॉपमध्ये ओळख काढून नोकरीला ठेवायचे. तो आरोपी मालकाचा विश्वास संपादन करून संधी मिळताच तिजोरीची बनावट चावी बनवून ज्वेलर्स व त्याच्या घरच्या सदस्यांना गुंगीचे औषध देत ज्वेलर्स शॉप लुटून पोबारा करत. त्यानंतर चोरीतील सोने वितळवून त्याची विक्री गुजरात येथे करून हवालामार्फत साथीदारांना पैसे पाठवायचे. त्यानुसार बोरिवली पश्चिम येथील ज्वेलर्स मालकाकडे २०१७ मध्ये मनिष हा कामाला राहिला होता. कित्येक महिन्यापासून प्रामाणिक काम करणाऱ्या मनिषवर मालकाचा विश्वास होता. त्यामुळेच मालक दुकान बंद करण्यासाठी चाव्या मनिषकडे देत असे. मनिषने मालकाची नजर चुकवून त्या चाव्यांचा छाप साबणावर घेऊन बनावट चाव्या बनवल्या होत्या. १० एप्रिल २०१७ रोजी मालक काही कामानिमित्त मुंबई बाहेर गेले होती. याच संधीचा फायदा उठवत मनिषने दुकानात असलेल्या मालकाच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन दुकानातील १ कोटी ३१ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला.