खळबळजनक! दिव्यांग मुलीवर बलात्कार, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:36 IST2019-10-10T14:33:38+5:302019-10-10T14:36:42+5:30
खेरवाडी पोलिसांची कारवाई

खळबळजनक! दिव्यांग मुलीवर बलात्कार, दोघांना अटक
मुंबई - दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तिच्या प्रियकरासह अन्य एकाला मंगळवारी अटक करण्यात आली. ही कारवाई खेरवाडी पोलिसांनी केली असून, लखन काळे आणि संदीप कुऱ्हाडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वांद्रे पूर्व येथील सोसायट्यांमध्ये काम करत तेथेच राहणारी २५ वर्षीय तरुणी दिव्यांग होती. ऐकायला व बोलायला येत नसलेली ही दिव्यांग तरुणी रविवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. घरमालकाने बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी याबाबत तिच्या विरार येथे राहणाऱ्या कुटुंबीयांना कळविले. पुढे खेरवाडी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली आणि तिचा शोध सुरू केला. तिचे मोबाइल लोकेशन ठाणे दाखवत होते, त्यानुसार पोलीस पथक त्या दिशेने रवाना झाले. मात्र तपासादरम्यान दादरला ती कुऱ्हाडेसोबत त्यांना दिसली. त्यानुसार पोलिसांनी कुऱ्हाडेला ताब्यात घेतले.
कुऱ्हाडेकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याला या तरुणीशी लग्न करायचे होते, त्यामुळे कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यासाठी तो तिला आपल्या ठाण्यातील घरी घेऊन गेला होता. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतर कुऱ्हाडेने तिला त्याचा मित्र काळे याला घरी सोडण्यास सांगितले. मात्र तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुऱ्हाडेला समजताच तो तिला वांद्रे येथे तिच्या घरमालकाकाडे घेऊन निघाला होता. त्याच दरम्यान दादर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्याला आणि नंतर काळेला अटक केली. पोलिसांनी दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.