धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:17 IST2021-09-15T14:56:30+5:302021-09-15T16:17:50+5:30
Jan Mohhamad Shaikh : जानच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कुटुंबियांना पोलिसांनी आपल्या देखरेखीखाली ठेवलं असल्याची माहित मिळत आहेत.

धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखाली
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एकमुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (४७) असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. काल त्याच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर धारावीतील गल्लीबोळ्यात एकच खळबळ माजली आहे. जानला अमली पदार्थाचे व्यसन असल्याची देखील चर्चा असून एक चरसी दहशतवादी बनल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
जानला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात राहतो. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी धारावी पोलीस ठाण्यात आणलं. त्यावेळी धारावी पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जानच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कुटुंबियांना पोलिसांनी आपल्या देखरेखीखाली ठेवलं असल्याची माहित मिळत आहेत. तसेच जानला उत्तर प्रदेशला जाण्यासाठी तिकीट देणाऱ्या मोहम्मद अजगर शेख या एजन्टला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
धारावीतील संशयित दहशतवाद्यांच्या पत्नीच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल https://t.co/MWmS2WfPXN
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
त्याचप्रमाणे समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली असल्याची महत्वाची माहिती उघड झाली आहे. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली.