मानसिंग बोंद्रेला सहकार्य करणारा बडा राजकिय नेताही चौकशीच्या फेऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:19 IST2022-01-16T15:37:43+5:302022-01-16T16:19:31+5:30
Firing Case : अंदाधुंद गोळीबार प्रकरण, घटनास्थळाचे चित्रण करणाऱ्यासह मोटारचालकही अटक; अश्रयदात्यांची चौकशी

मानसिंग बोंद्रेला सहकार्य करणारा बडा राजकिय नेताही चौकशीच्या फेऱ्यात
कोल्हापूर : अंबाई टॅंक परिसरात अंदाधुंद गोळीबार करणारा मानसिंग विजय बोंद्रे याला पसार कालावधीत महिनाभर सहकार्य करणाऱ्या नात्यातील एका बड्या राजकिय नेत्याचीही चौकशी होणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली. दरम्यान, गोळीबार घटनेचे व्हिडीओ चित्रण करणारा सोहेल शेख (सद्या रा. दत्तात्रय कॉलनी, लक्ष्मीपुरी. मुळ रा. वडणगे, ता. करवीर) व त्याच्या अलीशान मोटारीचा चालक विजय भालेकर (रा. फुलेवाडी) या दोघांनाही पोलिसांनीअटक केली.
शिक्षण संस्था व मालमत्ता वाटणीच्या वादातून मानसिंग बोंद्रेने दि. १३ डिसेंबरला मध्यरात्री फिल्मी स्टाईलने अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर मानसिंगने आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार त्याचा चुलतसावत्र बंधू अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे याने जुना राजवाडा पोलीसात दिली. मानसिंगने अटकेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. पण तो फेटळला. पहाटे तो रत्नागिरीहून कोल्हापूरला येत असता लांजानजीक आंबा घाटात धोपेश्वर फाटा येथे त्याची मोटारकार आडवून त्याला अटक केली. सद्या तो दि. १८ जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत आहे. तर त्याचा
सहकाऱ्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, रविवारी पहाटे त्याच्या अलीशान मोटारीचा चालक विजय भालेकर तसेच घटनास्थळी बोंद्रे याच्या गोळीबाराचे व्हिडीओ चित्रण करणारा त्याचा सहकारी सोहेल शेख यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयाने बुधवार, दि. १९ जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, बोंद्रे पसार झाल्यानंतर गोळीबाराचे चित्रण करणारा सोहेलसह दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यावेळी सोहेलने चित्रण केल्याबाबत नकार दिला होता. बोंद्रेला अटक केल्यानंतर रविवारी पहाटे सोहेल शेखला पुन्हा अटक केली.