सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पडला खाडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:00 IST2019-01-28T19:59:27+5:302019-01-28T20:00:35+5:30
अभिनव मित्रांसोबत वसई - पनवेल रेल्वे मार्गावरील खाडीवरील पुलावर फिरायला गेला होता.

सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पडला खाडीत
ठाणे - डोंबिवली परिसरात 15 वर्षीय शाळकरी मुलगा सेल्फी घेताना खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडल्याने आहे. अभिनव झा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो 10 वीच्या वर्गात शिकत होता. अभिनव मित्रांसोबत वसई - पनवेल रेल्वे मार्गावरील खाडीवरील पुलावर फिरायला गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाडीत पडला आणि बुडाला.
डोंबिवली पश्चिमेस राहणारा अभिनव आणि त्याचे मित्र ट्यूशन क्लासमधली परीक्षा रद्द झाल्याने फिरायला गेले होते. वसई-पनवेल रेल्वेमार्गावरील खाडी पुलावर मित्रांसोबत मस्ती करताना सेल्फी काढण्याच्या नादात तो खाडीत पडला. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याच्या घरी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं खाडीत शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत अभिनवचा शोध लागलेला नव्हता. अभिनव खाडीत नेमका कसा पडला, या प्रकरणी डोंबिवली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.